ऍन्किलोसिंग स्पॉन्डिलायटिस

ऍन्किलोसिंग स्पॉन्डिलायटिस एक जीर्ण सुजेचा आजार आहे. त्यात मणके, सॅक्रोइलिअॅ‍क सांधे (माकड हाड), काही वेळा खुबा आणि हातापायांचे गुडघे, घोटे तसेच कोपर हे सांधे प्रभावित होतात. ‘ऍन्किलोसिंग’ म्हणजे जोडलेला आणि ‘स्पॉन्डिलायटिस’ म्हणजे मणक्यांच्या सांध्यांची सूज. या दोन शब्दांपासून ऍन्किलोसिंग स्पॉन्डिलायटिस हे नाव ठरविण्यात आले. नावाप्रमाणेच याचा अर्थ आहे. यात मणक्यांचे, सॅक्रोइलिअॅक आणि काही वेळा खुब्यांचे सांधे दीर्घकाळच्या सुजेमुळे चिकटतात. याला सिरोनिगेटिव्ह स्पॉन्डिलो आर्थ्रोपॅथी (Seronegative Spondylo Arthropathy - SSA) सुद्धा म्हणतात. कारण या आजारात बहुतेक वेळा रक्तात ह्रुमॅटॉइड फॅक्टर सापडत नाही. तो दोष ह्रुमॅटॉइड आरथ्रायटिससारख्या सुजेच्या आमवातात सापडतो.
कोणाला होतो?
20-30 वर्षे वयाच्या तरुणांना विशेषत: हा आजार होतो आणि तो स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये तिपटीने जास्त आढळतो. जर आई-वडील, भावंडे किंवा मुलांपैकी कोणाला अॅन्किलोसिंग स्पॉन्डिलायटिस असेल तर हा आजार होण्याची शक्यता 5 ते 16 पटींनी जास्त असते. HLA B27 नावाच्या आनुवंशिक घटकामुळे कुटुंबातल्या अनेकांना अॅन्किलोसिंग स्पॉन्डिलायटिस होण्याचा धोका असतो.
कशामुळे होतो?
अॅन्किलोसिंग स्पॉन्डिलायटिसची उत्पत्ती कशी होते हे जरी माहीत नसले तरी हा आजार कसा वाढत जातो, मणक्यांमधे ताठरपणा कशामुळे येतो याबद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे. हा आजार प्रतिकारशक्तीचा बिघडल्याने होतो असे आता समजले जाते. आनुवंशिक कारण असलेल्या व्यक्तींमध्ये एखाद्या आकस्मिक (Tiggering) कारणामुळे हा आजार होतो.
अॅन्किलोसिंग स्पॉन्डिलायटिसमध्ये काय होते?
हा आजार सांध्याजवळच्या हाडापाशी सुरू होतो. तिथे हाडाला लिगामेन्ट जोडलेली असते (Enthesis). सुजेच्या पेशी हाडापाशी वाढत जातात. त्यामुळे हाडे अशक्त होतात. शरीर त्याचा प्रतिकार करत नवीन हाडे तयार करत असते. जसजसा आजार वाढत जातो तसतसे हाड अधिकाधिक अशक्त होत जाते. अखेर सूज ओसरली तरी हाडांची हानी भरून काढण्यासाठी शरीर नवीन अस्थि निर्माण करत रहाते. या सार्‍या प्रक्रियेत कॅल्सिफिकेशन (हाडासारखे कॅल्शियम तयार होणे) हे स्नायू आणि मणक्यातल्या चकत्यांपर्यंत पोचते. अखेर हाडे एकमेकांना चिकटतात. त्याला बोनी अॅन्किलोसिस (Bony Ankylosis) म्हणतात. हे या आजाराचे प्रमुख लक्षण आहे.
लक्षणे ?
अॅन्किलोसिंग स्पॉन्डिलायटिसचे नेहमीचे मुख्य लक्षण म्हणजे जीर्ण कंबरदुखी आणि नितंब दुखणे. या दुखण्याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे : 1. ऐन तारुण्यात सुरू होणे (20-30 वर्षे).
2. दुखणे हळूहळू वाढणे (दुखापतीनंतर होणार्‍या वेदनेसारखे नाही)
3. तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ रहाणे.
4. विश्रांती घेतल्यानंतर दुखणे वाढणे (उदा. सकाळी).
5. काम केल्यावर बरे वाटणे.
6. उत्तररात्री जाग येणे.
7. सकाळी उठल्यानंतर सांध्याचा ताठरपणा 30 मिनिटांपेक्षा जास्त काळ रहाणे.
8. उजवी-डावीकडे आलटून-पालटून होणारी कंबरदुखी.
काही कालावधीनंतर हाडे एकमेकांना चिकटल्यामुळे पाठीची/कंबरेची लवचिकता कमी होते. इतर सांधे देखील सुजू शकतात. एन्थेसायटिसमुळे कोपर, टाच आणि बरगड्या इत्यादी ठिकाणी दुखते. जीर्ण सुजेमुळे काही वेळा बारीक ताप, थकवा आणि वजन कमी होणे अशी सार्वदेहिक लक्षणे दिसू शकतात. अॅन्किलोसिंग स्पॉन्डिलायटिसमुळे 25% रुग्णांच्या डोळ्यात दोष निर्माण होतो. आयरायटिसमुळे (बुबुळांची सूज Iritis) अचानक तीव्र वेदना, डोळ्यात लालसरपणा आणि अंधूक/अस्पष्ट दिसणे अशी लक्षणे होतात.
निदान?
अॅन्किलोसिंग स्पॉन्डिलायटिसचे निदान रुग्णाची लक्षणे, शारीरिक तपासणी आणि क्ष-किरण तपासण्या (Imaging) या सर्वांवर अवलंबून असते. अॅन्किलोसिंग स्पॉन्डिलायटिसच्या रुग्णांच्या सॅक्रो इलिअॅक [माकडहाड (Sacrum) आणि ओटीपोटाचे हाड (Ilium) जोडणार्र्‍यों] सांध्यांमध्ये काही विशिष्ट बदल दिसतात, हे सर्व बदल क्ष-किरण तपासणीत दिसतात. आजाराची लक्षणे दिसू लागल्यानंतर क्ष-किरण तपासणीतील दोष निर्माण होण्यास बराच कालावधी लागतो. जेव्हा रुग्णांमध्ये लक्षणे, आजाराचा इतिहास आणि शारीरिक तपासणी यावरून अ‍ॅन्किलोसिंग स्पॉन्डिलायटिसची शंका येते. अशावेळी एक्स-रे चा उपयोग आजाराच्या निश्‍चित निदानासाठी होऊ शकतो. एम.आर.आय. (MRI) आणि सी.टी. (CT) स्कॅन तपासण्या एक्स-रेपेक्षा अधिक माहिती देतात. अॅन्किलोसिंग स्पॉन्डिलायटिस आजाराबद्दल जर शंका असेल आणि एक्स-रे मध्ये काही स्पष्टपणे दिसत नसेल अशावेळी त्यांचा उपयोग केला जातो. अॅन्किलोसिंग स्पॉन्डिलायटिससाठी निश्‍चित अशी रक्त तपासणी नाही. HLA B27 या तपासणीमुळे काही अंशी मदत होते. इ.एस.आर. (E.S.R.) आणि सी.आर.पी. (C.R.P.) सारख्या तपासण्यांचाही काही रुग्णांत उपयोग होतो.
उपचार ?
आजाराची लक्षणे आणि तीव्रता यावर उपचार अवलंबून आहेत. सर्वात प्रमुख उपचार आहेत व्यायाम, सूज कमी करणारी वेदनाशामके (NSAID) आणि काही वेळा आजार कमी करणारी विशेष औषधे (DMARD). जर या औषधांचा काहीच उपयोग होत नसेल तर अॅन्टी ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर (Anti-TNF) औषधांमुळे काही रुग्णांमध्ये आशादायक परिणाम दिसून आले आहेत.
व्यायाम ?
व्यायाम म्हणजे व्यवस्थित ताठ बसणे, दीर्घ श्‍वास घेणे, पाठ मागे वाकवणे आणि इतर ताणांचे प्रकार. www.nass.co.uk/exercises.htm या संकेतस्थळावर व्यायामाचे प्रात्यक्षिकासह विस्तृत वर्णन केले आहे. मानेचे व्यंग टाळण्यासाठी पातळ उशी वापरावी आणि पाठीवर सरळ झोपावे. जाड उशी टाळावी.
औषधे ?
सूज कमी करणारी वेदनाशामक औषधे हीच यासाठी मुख्य औषधे. ती नियमितपणे घेतली पाहिजेत. संशोधनातून असे दिसून आले आहे की, हीच वेदनाशामके दीर्घ काळ वापरली की आजाराचे नियंत्रण देखील करतात. योग्य मात्रेत निदान दोन आठवडे घेतले तरच या वेदनाशामकाचा परिणाम दिसून येतो. त्यानंतरही ती प्रदीर्घकाळ घेतली पाहिजेत. याचा सर्वसामान्य दुष्परिणाम म्हणजे पोट बिघडणे. ज्या रुग्णांना पूर्वी किंवा सध्या जठराच्या/आतड्याच्या व्रणाचा त्रास आहे, रक्तस्राव होतो किंवा जे रक्त पातळ करणारी औषधे घेतात त्यांनी व्रण होऊ न देणारी औषधे (Anti-ulcer Agents) त्यासोबत घ्यावीत अथवा सेलेकॉक्सिबसारखी इतर वेदनाशामक औषधे वापरावीत. सल्फासॅलॅझिन हे एक आजार नियंत्रित करणारे औषध (DMARD) आहे. त्याने आजाराची तीव्रता कमी होत असल्यामुळे ते अॅन्किलोसिंग स्पॉन्डिलायटिसमध्ये वापरले जाते. त्यामुळे सांधेदुखीची लक्षणे काही प्रमाणात कमी होतात. परंतु मणक्यांच्या दुखण्यावर आणि ताठरपणावर याचा फारसा परिणाम होत नाही. औषध सुरू केल्यानंतर 6 महिन्यांत काही सुधारणा दिसली नाही तर औषध बंद करावे. सल्फासॅलॅझिनमुळे मळमळणे, गरगरणे, डोकेदुखी आणि त्वचेवर पुरळ येणे असे उपद्रव होतात. रक्ताल्पता (पेशी कमी होणे) सुद्धा यामुळे होते. हे औषध घेणार्‍या रुग्णांनी नियमितपणे रक्तपेशी आणि यकृताशी संबंधित रक्ततपासण्या केल्या पाहिजेत. मेथोट्रेक्सेटसारख्या आजाराची तीव्रता कमी करणार्‍या औषधांचा क्वचितच उपयोग होतो. सूज कमी करणारी वेदनाशामक औषधे आणि सल्फासॅलॅझिनचा ज्या रुग्णांना काहीच उपयोग होत नाही त्यांचे ह्रुमॅटॉलॉजिस्टकडून मूल्यमापन झाले पाहिजे. त्यांच्यासाठी अॅन्टी टीएनएफ औषधे - इन्फ्लिक्सिमॅब, इटानरसेप्ट व अॅडॉलिम्युमॅब इत्यादींचा विचार केला जातो. ही औषधे फारच परिणामकारक आहेत. औषध सुरू केल्यापासून काही दिवसांपासून ते काही आठवड्यातच लक्षणीय सुधारणा दिसून येते. परंतु ही औषधे आजार रोखण्यासाठी फारशी उपयोगी नसावीत असे दिसते.
स्टिरॉइडस् -
स्टिरॉइड औषधांची अॅन्किलोसिंग स्पॉन्डिलायटिसच्या आजारात क्वचितच गरज भासते. उलट दीर्घकाळ स्टिरॉइड घेतल्यामुळे अस्थिक्षय निर्माण होऊ शकतो. जे रुग्ण इतर उपचारांना फारसा प्रतिसाद देत नाहीत त्यांना सॅक्रोइलिअॅक आणि इतर सांध्यात स्टिरॉइडचे इंजेक्शन दिल्याने त्यांच्या वेदना कमी होऊ शकतात. अॅन्किलोसिंग स्पॉन्डिलायटिसच्या रुग्णांना अस्थिक्षय होण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी कॅल्शियम आणि ‘ड’जीवनसत्व घेतले पाहिजे. अॅलेन्ड्रोनेट, रिसेड्रोनेट आणि झोलेन्ड्रोनिक अॅसिडसारखी अस्थिक्षय कमी करणारी इतर काही औषधे परिस्थितीनुसार योग्य रुग्णात वापरली जातात.
शस्त्रक्रिया -
अॅन्किलोसिंग स्पॉन्डिलायटिसच्या रुग्णांमध्ये खुब्याच्या संधिवातामुळे सतत वेदना होऊन तेथील हालचाली फार मर्यादित झाल्यास संपूर्ण खुबा बदलून कृत्रिम खुबा बसवण्याची शस्त्रक्रिया उपयुक्त आहे. फार थोड्या रुग्णांमध्ये मानेचे मणके एकमेकांना चिकटतात (Fusion). मणके सरकून मज्जारज्जूची हानी?होऊ नये यासाठी त्यांना मणक्याच्या शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. ज्यांच्या मणक्यांमध्ये फारच व्यंग/दोष आहेत त्यांच्यासाठी मणके सरळ करण्याच्या वेज ऑस्टोओटॉमी (Wedge Osteotomy) सारख्या शस्त्रक्रियेचा सल्ला देतात.
उपद्रवांचा प्रतिबंध
हाडे अशक्त आणि ठिसूळ झाल्यामुळे धडपडून मणक्याचे फ्रॅक्चर होण्याची शक्यता असल्यामुळे सर्वतोपरी काळजी घ्यायला पाहिजे. झोप येण्यासाठी वापरली जाणारी तसेच गुंगी आणणारी औषधे आणि मद्यपान टाळले पाहिजे. त्यामुळे धडपडण्याची भीती जास्त असते. सामूहिक मैदानी खेळ तसेच जोरात आघात होऊ शकणारे खेळ टाळले पाहिजेत. धूम्रपानामुळे आजार आणखी तीव्र होतो. त्यासोबतच बिघडलेले मणके आणि बरगड्यांमधल्या फुफ्फुसावरही दुष्परिणाम होतो. म्हणूनच या आजारात धूम्रपान पूर्णपणे निषिद्ध आहे.
सूचना :
ही माहिती म्हणजे वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. सदर लेखातील मते ही तज्ञ डॉक्टरांच्या गटाची आहेत. इंडियन ह्रुमॅटॉलॉजी असोसिएशनचे धोरण यात अंतर्भूत नाही.