सल्फासॅलॅझिन

25 वर्षांपासून अधिक काळापासून वेगवेगळ्या प्रकारच्या संधिवातामध्ये सल्फासॅलॅझिन हे औषध वापरले जाते. आतड्यांच्या काही आजारांमध्ये सुद्धा हे वापरले जाते.
हे औषध कसे घ्यायचे?
ज्या व्यक्तींना सल्फा औषधांची अ‍ॅलर्जी आहे त्या व्यक्तींनी हे औषध घेऊ नये. हे दिवसातून दोनदा तोंडाने घ्यायचे आहे. 500 आणि 1000 मि.ग्रॅ. गोळीच्या स्वरूपात हे उपलब्ध आहे. याचा सुरूवातीचा डोस दररोज 500 मि.ग्रॅ. असे एक आठवडा नंतर 1000 मि.ग्रॅ. असे पुढच्या आठवड्यात आणि त्यानंतर दररोज 1500 मि.ग्रॅ. त्यापुढच्या आठवड्यात याप्रमाणे घेतात. जर त्वचेवर कुठली अ‍ॅलर्जी आली नाही किंवा दुसरा कुठलाही उपद्रव दिसला नाही तर दररोज 2000 मि.ग्रॅ. डोस देऊन कायम ठेऊ शकतो. जास्तीत जास्त 3 ग्रॅमचा रोजचा डोस तुमचे डॉक्टर वापरू शकतात.
हे औषध कितपत उपयुक्त आहे?
65 ते 70% रुग्णांमध्ये सांधेदुखी आणि सांध्याची सूज या औषधाने कमी होते असे दिसून आले आहे. ह्यामुळे रुग्णाची कार्यक्षमता वाढते आणि जीवनस्तर उंचावतो. औषधाचा परिणाम 12 आठवड्यानंतर सुरू होतो आणि उत्तम परिणाम दिसण्यास 6 महिने लागतात.
ह्याचे उपद्रव काय आहेत?
त्वचेवर पुरळ येणे, त्वचेला खाज येणे, मळमळणे, भूक न लागणे, तोंड येणे हे सुरूवातीच्या काळात सगळ्यात जास्त प्रमाणात होणारे उपद्रव आहेत. त्वचेवर पुरळ उठले, फार ताप आला, खूप तोंड आले तर औषध थांबवावे आणि आपल्या डॉक्टरांना भेटावे. ह्या औषधामुळे क्वचित प्रसंगी तुमच्या रक्तपेशींचे प्रमाण बदलू शकते. यासाठी तुम्हाला नियमित रक्त तपासावे लागते. पुरुषांमध्ये ह्या औषधामुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते, औषध थांबल्यावर ती पुन्हा नॉर्मल (प्राकृत) होते.
कोणत्या तपासण्या नियमित कराव्यात?
सुरूवातीला 6 महिने खालील रक्त तपासण्या दर 2 महिन्यांनी कराव्यात, त्यानंतर दर 6 महिन्यांनी कराव्यात.
 हिमोग्लोबिन 7 ग्रॅम/डी.एल. पेक्षा कमी नसावे.
 पांढर्‍या रक्तपेशींची संख्या (Total Leucocyte Count) 4000/क्यु.मि.मि. पेक्षा कमी नसावी.
 प्लेटलेट पेशींची संख्या 1 लाख/क्यु.मि.मि. पेक्षा कमी नसावी.
 एस.जी.ओ.टी. (SGOT) 80 युनिट/मि.लि. पेक्षा जास्त नसावे.
 एस.जी.पी.टी. (SGPT) 80 युनिट/मि.लि. पेक्षा जास्त नसावे.
 क्रिअ‍ॅटिनिन 2 मि.ग्रॅ./डी.एल. पेक्षा जास्त नसावे.
यापैकी एखाद्या तपासणीच्या रिपोर्टमध्ये दोष आला तर औषध बंद करावे आणि आपल्या डॉक्टरांना भेटावे.
गर्भारपण
गर्भारपणात वापरल्याने सॅलॅझोपायरीनमुळे फारसे उपद्रव दिसून आलेले नाहीत. तरीही गर्भ धारणेपूर्वी तीन महिने हे औषध बंद करणे योग्य ठरते.
सूचना :
ही माहिती म्हणजे वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. सदर लेखातील मते ही तज्ञ डॉक्टरांच्या गटाची आहेत. इंडियन ह्रुमॅटॉलॉजी असोसिएशनचे धोरण यात अंतर्भूत नाही.