लहान मुलांचा आमवात (जुवेनाईल इडिओपॅथिक आर्थ्रायटिस)

जुवेनाईल इडिओपॅथिक आर्थ्रायटिस म्हणजे काय?
लहान मुलांच्या प्रदीर्घ (6 आठवड्यांपेक्षा अधिक) संधिवातांचे जुवेनाईल इडिओपॅथिक आर्थ्रायटिस (JIA) हे एक नेहमीचे कारण आहे. लक्षणानुरूप त्याचे विविध प्रकार आहेत. या आजारात मुलांमध्ये सांध्याचे दुखणे आणि सूज या बरोबरच ताप, त्वचेवर पुरळ येणे, लसीकाग्रंथींची वाढ, पाठदुखी, डोळे लाल होणे किंवा टाच/पाय दुखणे अशी लक्षणेही असू शकतात.
हा आजार माझ्या मुलाला का झाला?
हा आजार कशामुळे होतो याचे निश्‍चित कारण सांगता येत नाही. आनुवंशिकता आणि वातावरणातील बदल काही अंशी कारणीभूत असतात. पण हे आजार घराण्यांमध्ये चालत आलेले नाहीत. केवळ 5% मुलांमध्ये कौटुंबिक इतिहास असतो.
याची सामान्य लक्षणे कोणती?
सांधेदुखीपासून सामान्यत: याची सुरूवात होते. नंतर सांध्यांना सूज येते. ती एक किंवा अनेक सांध्यांना असू शकते. याचसोबत कसकस, ताप, थकवा, सकाळी सांध्यांचा कडकपणा, इत्यादी लक्षणे असू शकतात. काही मुलांना खूप ताप येणे, त्वचेवर पुरळ येणे, तसेच ग्रंथी मोठ्या होणे ही लक्षणे सुद्धा सांधेदुखी सोबत असतात.
याचे निदान कसे करतात?
जुवेनाईल इडिओपॅथिक आर्थ्रायटिससाठी विशिष्ट प्रयोगशालेय तपासणी नाही. रुग्णांच्या तक्रारी आणि आजाराची लक्षणे यांच्या आधारे निदान केले जाते. इतर कुठला आजार नाही हे बघण्यासाठी तसेच आजाराची तीव्रता मोजण्यासाठी काही साध्या तपासण्या केल्या जातात.
याचे उपचार कसे करतात?
नॅप्रोक्सेन, आयबुप्रोफेनसारख्या वेदनाशामकांचा काही रुग्णांमध्ये त्वरित वेदना कमी करण्यासाठी उपयोग केला जातो. 1-2 सांधे सुजले असतील तर त्या सांध्यात कॉर्टिझोनचे इंजेक्शन देणे हा आजार नियंत्रणात आणण्याचा एक प्रभावी उपचार आहे. आजार जीर्ण स्वरूपाचा असल्यामुळे काही मुलांना आजाराच्या नियंत्रणासाठी मेथोट्रेक्सेटसारखी औषधे आवश्यक ठरतात. सॅलॅझोपायरिन, लेफ्लुनामाइड आणि जैविक औषधे ही आजारासाठी वापरली जाणारी अन्य काही औषधे. औषधांसोबतच मुलांना संतुलित आहार, स्प्लिन्टस् (सांध्याचे व्यंग टाळण्यासाठी संसाधने) फिजिओथेरपी (व्यायाम) आणि मानसिक आधाराची गरज असते.
मुलांनी आहाराची काय काळजी घेतली पाहिजे?
जुवेनाईल इडिओपॅथिक आर्थ्रायटिस आणि विशिष्ट आहाराचा काही संबंध असल्याचे सिद्ध झालेले नाही. बटाटे, डाळी इत्यादींनी सांधेदुखी वाढत नाही. स्नायूंचे आकारमान, हाडांची ताकद आणि पुरेशा हिमोग्लोबीनसाठी संतुलित आहार फार गरजेचा आहे. कॉर्टिझोन घेणार्‍या मुलांनी चरबीयुक्त पदार्थ आणि मीठ टाळले पाहिजे.
माझ्या मुलाला औषधे किती दिवस घ्यावी लागतील?
जुवेनाइल इडिओपॅथिक आर्थ्रायटिसच्या ऑलिगो-आर्टिक्युलर (4 किंवा कमी सांधे) प्रकारात थोडे दिवसांसाठीच औषध घ्यायचे असते. परंतु अनेक रुग्णांमध्ये दीर्घकालीन उपचार घ्यावे लागतात. आजार एकदा नियंत्रणात आला की, औषधाची मात्रा हळूहळू कमी करतात. आजार एक वर्षभर शांत राहिला तर औषध बंद देखील करता येते. या आजाराच्या काही प्रकारांमध्ये दीर्घकालीन उपचार घ्यावे लागतात.
हा आजार बरा होतो का?
1/3 मुले आजारातून पूर्णपणे बरी होतात आणि तरुणपणी त्या आजाराची काही लक्षणे शिल्लक रहात नाहीत. बाकीच्या मुलांमध्ये आजार कमी-जास्त होत रहातो. अगदी थोड्या मुलांचा आजार अखेरपर्यंत टिकून रहातो.
माझे मूल शाळेत जाऊ शकते का?
जुवेनाइल इडिओपॅथिक आर्थ्रायटिस असलेली अधिकांश मुले नक्कीच शाळेत जाऊ शकतात. त्यांनी शाळेत जावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. आजार सक्रिय असताना काही मुलांना मदत लागू शकते. अशावेळी वर्गशिक्षकासोबत केलेली चर्चा उपयोगी असते.
माझे मूल काम करू शकते का?
जर आजाराचे नियंत्रण लवकर आणि चांगले झाले तर बहुतेक मुले शिकू शकतात आणि व्यवसाय करू शकतात. काही मुलांना शारीरिक मर्यादेमुळे अंगमेहनतीची कामे करता येत नाहीत. व्यवसायाविषयी निर्णय घेताना आपल्या डॉक्टरांशी चर्चा केलेली चांगली.
या आजाराचे दीर्घकालीन परिणाम काय?
हा आजार सामान्यत: बरा होत असला तरी 50% मुलांचे सांधे पुढील आयुष्यात थोडेफार दुखत रहातात. बहुतेक मुले चांगले शिक्षण घेऊन नोकरी करू शकतात. आजार नियंत्रणात आणण्यासाठी लवकर आणि प्रभावी उपचार करण्यावर या आजारातून सुधारणे अवलंबून असते.
याचे उपद्रव काय?
या आजाराच्या सार्वदेहिक प्रकारात (SOJIA) मुलांमध्ये हृदयाभोवती पाणी साठणे (Pericarditis), फुफ्फुसाभोवती पाणी साठणे (Pleuritis), हृदयाला सूज येणे (Myocarditis), वजन खूप कमी होणे अशी लक्षणे दिसतात. क्वचित Macrophage Activation Syndrome नावाची गंभीर परिस्थिती येते. JIA च्या इतर प्रकारांमध्ये पायाची लांबी कमी-जास्त होणे, खुब्याच्या सांध्यांचा दोष आणि सांधे वेडेवाकडे होणे अशा गोष्टी उद्भवतात. डोळ्यांमध्ये सूज आल्यामुळे (युव्हेआयटिस Uveitis) डोळे लाल होणे, अंधुक दिसणे, अथवा हळूहळू दृष्टी कमी होणे अशी लक्षणे निर्माण होतात. म्हणून डोळ्यांची नियमित तपासणी आवश्यक आहे.
औषधांपैकी कॉर्टिझोनमुळे वजन वाढणे, खुजेपणा आणि मुरुमाचे फोड येणे असे उपद्रव होतात. मेथोट्रेक्सेट, सल्फासॅलॅझिन आणि लेफ्लुनामाइडमुळे क्वचित रक्तपेशी कमी होतात आणि यकृताच्या विकारांमध्ये (Enzyme) असमतोल निर्माण होऊ शकतो.
या आजाराचा वयात येण्यावर काही परिणाम होतो का?
आजार व्यवस्थित नियंत्रणात असेल तर तारुण्यातील शरीराच्या वाढीवर काहीही परिणाम होत नाहीत. SOJIA (सार्वदेहिक) किंवा Polyarticular JIA (5 किंवा जास्त सांधे) मध्ये आजार सक्रिय असला तर काही मुलांमध्ये युवावस्था काहीशी उशीरा येते.
सूचना :
ही माहिती म्हणजे वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. सदर लेखातील मते ही तज्ञ डॉक्टरांच्या गटाची आहेत. इंडियन ह्रुमॅटॉलॉजी असोसिएशनचे धोरण यात अंतर्भूत नाही.