गाउट

गाउट म्हणजे काय?
शेकडो वर्षांपासून माहीत असलेल्या गाउट या आजारामध्ये सांधे दुखतात. त्याची सुरूवात बहुधा एखाद्या सांध्याची (सामान्यपणे पायाचा अंगठा) सूज आणि तीव्र वेदना अशी होते. त्यामुळे रुग्णाची कार्यक्षमता कमी होते.
का होतो?
रक्तातले युरिक अॅसिड (चयापचयातील टाकाऊ घटक) वाढल्यामुळे गाउट होतो. युरिक अॅसिड जास्त प्रमाणात निर्माण झाले किंवा विशेषत: मूत्रपिंडाकडून व्यवस्थित निचरा झाला नाही तर शरीरात युरिक अॅसिड वाढते. सांध्यात सुईसारखे स्फटिक जमा होतात. समुद्री मासे शेल फिश व इतर मासे किंवा मद्यासारख्या आहारीय पदार्थांमुळे युरिक अॅसिड वाढून गाउटचे अॅटॅक (वेग) येऊ शकतात. अॅस्पिरिन (मध्यम मात्रा), हायड्रोक्लोरोथायाझाइड सारखी लघवीचे प्रमाण वाढवणारी औषधे, रक्तदाबाची अॅटेनेलॉलसारखी औषधे यामुळे सुद्धा गाउटचा वेग येऊ शकतो. स्थूलता, वाढलेला रक्तदाब, रक्तातली चरबी वाढणे (Hyperlipidemia) आणि मधुमेह हे आजार अनेकदा गाउट सोबत असतात.
याची सामान्य लक्षणे काय असतात?
एखाद्या सांध्याच्या दुखण्यापासून सुरूवात होते. तीव्र वेदना 6-12 तासांपर्यंत राहू शकते. दुखण्याबरोबर सांध्याला सूज आणि लालसरपणाही येतो. क्वचित थंडी वाजून ताप येतो. आजाराच्या सुरूवातीच्या काळात दोन अॅटॅकमध्ये वेदनामुक्त अवधी असतो. जसा आजार वाढत जातो तसा हा वेदनामुक्त कालावधी कमी होत जातो आणि सांध्याच्या नाशासोबत सतत आणि वाढत जाणार्‍या वेदना सुरू होतात.
त्याचे निदान कसे करतात?
संधिवाताचे अनेक प्रकार गाउटसारखे असतात. म्हणून त्याचे व्यवस्थित निदान होणे अत्यावश्यक आहे. रुग्णाला प्रारंभी एक किंवा दोन सांध्यात सूज येते, अतीशय तीव्र वेदना होतात तसेच दोन अॅटॅकमध्ये वेदनाविरहित कालावधी असतो तेव्हा गाउटची शंका घेतली जाते. गाउटचे प्रारंभीचे वेग सामान्यत: रात्री येतात.सांध्यात विशिष्ट प्रकारचे स्फटिक सापडले तर निश्‍चित निदान करण्यास मदत होते. म्हणूनच सांध्यातील द्रवाची मोनोसोडियम युरेटच्या (MSU) स्फटिकांसाठी सूक्ष्मदर्शक यंत्राने (पोलराइज्ड) तपासणी अत्यावश्यक आहे. जीर्ण गाउटमध्ये त्वचेखालच्या गाठीत (Tophi) सुद्धा स्फटिक सापडतात. रक्तातले युरिक अॅसिड तपासणे महत्त्वाचे आहे. परंतु त्यामुळे कधीकधी दिशाभूल होऊ शकते. कारण काही वेळा ते तात्पुरते नॉर्मल असू शकते आणि अॅटॅक दरम्यान कमी सुद्धा होऊ शकते.
याचा उपचार काय?
अॅटॅकच्या सुरूवातीलाच कोल्चिसीन अतिशय प्रभावी ठरते. इन्डोमेथॉसिन आणि नॅप्रोक्सेनसारखी वेदनाशामक औषधे (NSAID) सुद्धा गाउटच्या बहुतेक तीव्र वेगामध्ये उपयोगी ठरतात. एक वेदनाशामक दुसर्‍यापेक्षा बरे असा कुठलाही पुरावा नाही. कमी कालावधीसाठी व जास्त मात्रेत दिलेले वेदनाशामक (NSAID) जलद कार्य करते. ह्या औषधांमुळे जठरात सूज अथवा जखम तसेच जुलाब होऊ शकतात. कमी कालावधीसाठी औषधे वापरली तर सामान्यत: सुसह्य होतात. जे रुग्ण (NSAID) वेदनाशामक किंवा कोल्चिसीन घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी कॉर्टिकोस्टिरॉइडचा चांगला पर्याय आहे. हे औषध तोंडाने (गोळी) किंवा इंजेक्शन (इन्ट्रामस्क्युलर) अशा स्वरूपात घेतले जाऊ शकते. कॉर्टिकोस्टिरॉइडचे इंजेक्शन एक-दोन सांधे प्रभावित असतील तर त्या सांध्यात देखील देता येते. युरिक अॅसिडची निर्मिती कमी करणारी औषधे (अॅलोप्युरिनॉल आणि नवा पर्याय म्हणजे फेबुक्सोस्टॅट), युरिक अॅसिडचे निष्कासन वाढवणारी औषधे (प्रोबेनेसिड) यांच्यामुळे युरिक अॅसिडचे प्रमाण कमी होते. ज्या रुग्णांच्या मूत्रपिंडाची कार्यक्षमता चांगली आहे आणि ज्यांच्यात युरिक अॅसिड प्रमाणापेक्षा जास्त निर्माण होत नाही त्यांच्यासाठी प्रोबेनेसिड वापरतात. आजाराच्या तीव्र अॅटॅकमध्ये या औषधांचा उपयोग होत नाही. यासाठी ही औषधे वेग कमी झाल्यावरच सुरू करावीत. युरिक अॅसिड कमी करणारी औषधे सुरू असताना सुद्धा गाउटचे वेग येऊ शकतात. म्हणून कमी मात्रेत कोल्चिसीन देऊन पुन्हा वेग येणार नाहीत असे पाहिले पाहिजे. युरिक अॅसिड कमी करणार्‍या औषधांची मात्रा हळूहळू वाढवली पाहिजे. त्यामुळे युरिक अॅसिडचे प्रमाण 6 मि.ग्रॅ./डे.लि. पेक्षा कमी राहिले पाहिजे. एवढे प्रमाण राहिले म्हणजे युरिक अॅसिडचे स्फटिक विरघळतात आणि नवीन स्फटिक जमा होत नाहीत. प्रभावित सांध्याला विश्रांती देणे, कोल्ड कॉम्प्रेस (बर्फ लावणे) यामुळे सुद्धा वेदना काही अंशी कमी होते. जीवनशैलीतील बदल - वजन कमी करणे, मद्यपान टाळणे, फ्रुक्टोज असलेली शीतपेये, प्युरिन जास्त प्रमाणात असलेले खाद्यपदार्थ कमी खाणे - यामुळे देखील युरिक अॅसिड कमी होण्यास मदत होते. काही वेळा गाउट नसलेल्या लोकांमध्ये युरिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते. सांधेदुखी नसताना युरिक अॅसिड वाढले तर त्याचे कारण शोधले पाहिजे. अयोग्य जीवनशैलीमुळे होणार्‍या मेटॉबॉलिक सिन्ड्रोम (रक्तदाब वाढणे, मधुमेह, कमरेचा घेर वाढणे इ.) या आजारात युरिक अॅसिड वाढते. यासाठी युरिक अॅसिड कमी करणारे औषध घेण्याची मात्र जरूर नाही.
किती दिवस औषध घ्यायचे?
एकदा औषध सुरू केल्यानंतर बहुधा जन्मभर घेतले पाहिजे.
या औषधांचे सामान्य दुष्परिणाम कोणते आहेत?
कोल्चिसीनमुळे मळमळ, उलटी आणि जुलाब होऊ शकतात. कोल्चिसीन, वेदनाशामके आणि कॉर्टिकोस्टिरॉइडमुळे आमाशयाचा क्षोभ, जखम किंवा अतिसार होऊ शकतात. पण कमी कालावधीसाठी ही औषधे वापरली तर सामान्यत: उपद्रव होत नाहीत. अॅलोप्युरिनॉलमुळे पोट बिघडणे, मळमळ, जुलाब होणे, तोंडात विचित्र चव किंवा गुंगी येणे असे उपद्रव होऊ शकतात. अॅलोप्युरिनॉलमुळे क्वचित घातक अॅलर्जी (त्याने मृत्यूही येऊ शकतो) होऊ शकते. जर त्वचेवर पुरळ, खाज, सूज (ओठ किंवा तोंडाला), चक्कर येणे, लघवी करताना दुखणे, लघवीसोबत रक्त पडणे, डोळे लाल होणे/दुखणे, थंडी वाजून ताप येणे, स्नायू/सांधे दुखणे किंवा श्‍वास घेण्यास त्रास होत असेल तर औषध बंद करून त्वरित डॉक्टरांना भेटावे. फेबुक्सोस्टॅटमुळे चक्कर येणे, गुंगी येणे, अतिसार, त्वचेवर पुरळ येणे, डोकेदुखी, रक्तदाब वाढणे व यकृताच्या कार्यप्रणालीत बिघाड होणे असे दुष्परिणाम झाल्याचे प्रसिद्ध झाले आहे.
मला मुलं होऊ शकतील का आणि माझ्या मुलांनाही हा आजार होईल का?
हो, तुम्हाला मुलं होऊ शकतात. आनुवंशिकतेमुळे कुटुंबातील इतर लोकांना हा आजार होऊ शकतो. 20% रुग्णांच्या कुटुंबात आधी कुणाला तरी गाउट झालेला असतो. गाउटचा कौटुंबिक इतिहास असणार्‍या रुग्णांमध्ये शरीराच्या प्युरिन कार्यप्रणालीतील एक प्रथिन (एन्झाइम-विकर) बिघडलेले असते.
माझ्यावर दीर्घकालीन परिणाम काय?
बहुधा सर्व रुग्णांमध्ये गाउटचे परिणामकारक उपचार करता येतात. त्यामुळे हळूहळू रुग्णांमध्ये अॅटॅक येणे बंद होते तसेच गाउटच्या गाठींची (Tophi) संख्या व आकार कमी होतात.
मी आहाराची काळजी कशी घ्यायची?
मद्यपान कमी करावे किंवा पूर्ण बंद करावे. मटण, शेल फीश व इतर मासे इत्यादी प्युरिनयुक्त पदार्थ तसेच फ्रुक्टोज शर्करायुक्त पेये टाळली पाहिजेत. भाज्यांतील प्रथिने अपायकारक नाहीत. कमी चरबी असलेल्या दुग्धजन्य पदार्थांनी युरिक अॅसिड कमी होण्यास मदत होते.
सूचना :
ही माहिती म्हणजे वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. सदर लेखातील मते ही तज्ञ डॉक्टरांच्या गटाची आहेत. इंडियन ह्रुमॅटॉलॉजी असोसिएशनचे धोरण यात अंतर्भूत नाही.