इंडियन ऋमोटोलॉजी असोसिएशन रुग्णप्रशिक्षण समिती

ऑस्टिओआर्थायटिस म्हणजे काय?
ऑस्टिओआर्थायटिस हा एक हळूहळू वाढणारा सांध्यांचा आजार असून तो विशेषतः मध्यम वयाच्या आणि ज्येष्ठ व्यक्तींमध्ये आढळतो. सांध्याची कूर्चा झिजून खराब होते तेव्हा हा आजार होतो, त्यामुळे सांध्याखालील हाड अकार्यक्षम होते.
ऑस्टिओआर्थायटिसचे प्रमाण किती आहे?
जागतिक आरोग्यसंघटनेच्या आजारांच्या जागतिक भाराविषयीच्या अहवालानुसार अपंगत्व येण्याच्या कारणांमध्ये गुडघ्याचा ऑस्टिओआर्थायटिस हा स्त्रियांमध्ये चौथ्या क्रमांकाचा आणि पुरुषांमध्ये आठव्या क्रमांकाचा आजार ठरण्याची शक्यता आहे.
ऑस्टिओआर्थायटिसची लक्षणे काय आहेत?
ऑस्टिओआर्थायटिसमध्ये विशेषकरून सांधेदुखी, सांधे थोडे आखडणे, सांध्यांची सूज, सांध्याची हालचाल केल्यावर आवाज येणे आणि सांध्याची कार्यक्षमता कमी होणे अशी लक्षणे दिसतात.
ऑस्टिओआर्थायटिसमध्ये कोणत्या सांध्यांवर परिणाम होतो?
ऑस्टिओआर्थायटिस शरीराचा भार पेलणाऱ्या सांध्यांमध्ये होतो. उदा. खुबे आणि गुडघे. हा आजार मणका आणि हाताच्या सांध्यांमध्ये देखील होतो.
ऑस्टिओआर्थायटिससाठी धोक्याचे घटक कोणते आहेत?
- वयस्कर असणे
- कुटुंबात ऑस्टिओआर्थायटिसचा इतिहास
- स्थूलता
- सांध्याला इजा किंवा सांध्याचा वारंवार वापर
ऑस्टिओआर्थायटिसचे निदान कसे होते?
ऑस्टिओआर्थायटिसचे निदान केवळ डॉक्टरांच्या तपासणीने होते. चाळीशीच्या पुढच्या व्यक्तींमध्ये सांधेदुखी हालचालीने वाढत असल्यास ऑस्टिओआर्थायटिसचे निदान होते. तपासणीमध्ये सांध्याला थोडीशी सूज आणि सांध्यात करकर आवाज आढळून येऊ शकतात.
ऑस्टिओआर्थायटिसच्या निदानामध्ये एक्स-रे तपासणीचा कितपत उपयोग होतो?
उभे राहून काढलेल्या गुडघ्यांच्या क्ष-किरण (एक्स- रे) तपासणीत आजाराची तीव्रता कळते तसेच सांध्याचे इतर आजार नसल्याची खात्री करता येते.
ऑस्टिओआर्थायटिसचे निदान करण्यासाठी कुठल्या रक्ताच्या तपासण्या आहेत का?
ऑस्टिओआर्थायटिसचे निदान करण्यासाठी रक्ताच्या तपासण्यांची गरज नसते.इंजेक्शन सांध्यामध्ये दिल्यास उपयोग होतो. हायल्युरोनिक ऍसिड डेरिव्हेटिव्हसारख्या वंगणाच्या (Lubricant) इंजेक्शनचाही उपयोग काही रुग्णांमध्ये होत असल्याचे दिसून आले आहे.
ऑस्टिओआर्थायटिसच्या उपचारांचे उद्दिष्ट काय आहे?
रुग्णाच्या वेदना कमी करून त्याची कार्यक्षमता वाढवणे हे ऑस्टिओआर्थायटिसच्या उपचाराचे उद्दिष्ट आहे.
उपचाराचे कोणते प्रकार उपलब्ध आहेत?
बिघडलेल्या सांध्यांची वेदना कमी करून कार्यक्षमता वाढवणे हे उपचाराचे ध्येय आहे. व्यायाम, औषधोपचार आणि क्वचित शस्त्रक्रिया यांच्या एकत्रित उपचाराने हे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होते.
गुडघ्याच्या ऑस्टिओआर्थायटिसमध्ये औषधां- व्यतिरिक्त इतर कुठले उपचार आहेत?
आजाराविषयी प्रशिक्षण, व्यायाम, संसाधनांचा उपयोग (उदा. काठी, इनसोल पादत्राणासाठी, गुडघ्यास पट्टा नी ब्रेस) आणि वजन कमी करणे हे औषधांव्यतिरिक्तचे उपचार आहेत. आधारासाठी संसाधने वापरणे आणि सांध्याला गरम शेक देणे यांचाही ऑस्टिओआर्थायटिसमध्ये उपयोग होतो.
मसाज, स्पा थेरपी, अॅक्युपंक्चर यांचा ऑस्टिओआर्थायटिसमध्ये उपयोग होतो का?
या उपायांनी थोड्या कालावधीसाठी वेदना कमी होण्यास मदत होते असे दिसून आले आहे. परंतु या गोष्टींना वैज्ञानिक आधार नाही. तसेच त्या खूप महाग आहेत आणि वारंवार करत रहाव्या लागतात.
कुठली औषधे उपलब्ध आहेत?
बाहेरून लावण्याची आणि तोंडाने घेण्याची औषधे अशी दोन्हीही ऑस्टिओआर्थायटिसमध्ये दुखणे कमी करण्यासाठी वापरली जातात. दुखणाऱ्या सांध्यांवरील त्वचेवर कॅपसेसिन मलम, लिडोकेन, डायक्लोफेनॅक जेल लावू शकतो. बाहेरून लावण्याच्या औषधांचा (एन् एस् ए आय डी सूज कमी करणारे स्टिरॉइड नसलेले वेदनाशामक मलम, कॅप्सेसिन) उपयोग होतो आणि ती सुरक्षित आहेत. प्राथमिक उपचारांसाठी अॅसेटॅमिनोफेन तसेच सूज कमी करणाऱ्या वेदनाशामक गोळ्यांचा उपयोग केला जातो. पॅरासेटेमॉल हे तोंडाने दिले जाणारे वेदनाशामक औषध आहे. दीर्घकालीन वापरासाठी त्याला विशेष पसंती दिली जाते. ज्या रुग्णांना पॅरासेटेमॉलने बरे वाटत नाही, त्यांच्यामध्ये एन् एस् ए आय डी वापरू शकतात. तीव्र वेदनेसाठी नारकोटिक्ससारखी अधिक प्रभावी औषधे लागू शकतात. या औषधांमुळे आजार बरा होत नाही परंतु वेदनेपासून आराम मिळतो. ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच वापरली पाहिजेत.
सांध्यामध्ये इंजेक्शनचा किती उपयोग होतो?
जेव्हा गुडघेदुखी अचानक वाढते किंवा सांध्याला सूज येते तेव्हा दीर्घकाळ कार्य करणाऱ्या कॉर्टिकोस्टिरॉइडचे इंजेक्शन सांध्यामध्ये दिल्यास उपयोग होतो. हायल्युरोनिक अॅसिड डेरिव्हेटिव्हसारख्या वंगणाच्या (Lubricant) इंजेक्शनचाही उपयोग काही रुग्णांमध्ये होत असल्याचे दिसून आले आहे.
ऑस्टिओआर्थायटिसच्या सगळ्या रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया केली पाहिजे का?
जेव्हा सांध्याची जास्त प्रमाणात हानी होते, रुग्णाला असह्य वेदना होतात किंवा कार्यक्षमता फार कमी होते, तेव्हा आर्थोस्कोपी आणि/किंवा सांधा बदलण्याच्या शस्त्रक्रियेच्या पर्यायांचा विचार करू शकतो.
ऑस्टिओआर्थायटिसच्या उपचारांमध्ये पूरक आहाराचा (उदा. ग्लुकोसामाइन) काय उपयोग होतो?
ऑस्टिओआर्थायटिसच्या उपचारांमध्ये बरीच आहारपूरके वापरली जातात. ग्लुकोसामाइन / कॉन्ड्रायटिन सल्फेट, कॅल्शियम आणि ड जीवनसत्त्व तसेच ओमेगा-३ फॅटी अॅसिडस् सर्वात जास्त वापरली जातात. कोलॅजेन पेप्टाइडस् ही नवी पूरके आहेत. बहुतेक सर्व आहारपूरकांची उपयुक्तता आणि सुरक्षितता याविषयी चांगला वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. सांध्याची कूर्चा खराब झाल्यावर ग्लुकोसामाइनचा काही उपयोग होत नाही.
दैनंदिन जीवनातील कोणत्या सवयी बदलणे ऑस्टिओआर्थायटिसमध्ये फायदेशीर ठरते?
ऑस्टिओआर्थायटिस हा पूर्ण बरा होत नाही. बसताना किंवा झोपताना व्यवस्थित शरीरस्थिती ठेवणे, मानेला आणि पाठीला आधार देणे, घरातील फर्निचरची व्यवस्था बदलणे (उदा. टॉयलेट सीट किंवा खुर्चीची उंची वाढवणे), सांध्याला दुखापत आणि सांध्याची सततची हालचाल (उदा. सांधे वाकवणे) टाळणे या गोष्टी उपयुक्त ठरतात.
व्यायामाने उपयोग होतो की दुखणे जास्त वाढते?
नियमित व्यायामाने स्नायूंची ताकद वाढते. मांडीच्या पुढील भागातील (क्वाड्रीसेप्स) स्नायूंची ताकद वाढवणाऱ्या व्यायामामुळे गुडघेदुखी कमी होण्यास व कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
ऑस्टिओआर्थायटिसच्या उपचारांमध्ये फिजिओ- थेरपिस्टचा किती सहभाग असतो?
तुमच्या सांध्यांचे उत्तम व्यायाम शिकण्यासाठी तसेच योग्य संसाधने निवडण्यासाठी फिजिओथेरपिस्ट तुम्हाला मदत करू शकतील.
ऑस्टिओआर्थायटिसचे दुखणे वाढू नये यासाठी कुठली परिणामकारक उपाययोजना आहे?
स्थूल व्यक्तींमध्ये वजन कमी झाल्याने वेदना कमी होतात आणि आजार बळावत नाही. योग्य वजन राखल्याने एकूणच तुम्हाला बरे वाटेल.
सूचना:
ही माहिती म्हणजे वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. सदर लेखातील मते ही तज्ञ डॉक्टरांच्या गटाची आहेत. इंडियन हुमॅटॉलॉजी असोसिएशनचे धोरण यात अंतर्भूत नाही.