अझाथायोप्रिन

अझाथायोप्रिन (AZA) हे औषध पूर्वी फक्त मूत्रपिंड बदललेल्या रुग्णांमध्ये वापरले जाई. गेल्या 20 ते 25 वर्षांत मात्र हे औषध संधिवात, त्वचाविकार व मूत्रपिंड विकार अशा इतर आजारांमध्ये वापरले जाऊ लागले आहे.
हे औषध कसे घ्यायचे?
रुग्णाच्या वजनाप्रमाणे रोज 2-4 मि.ग्रॅ./कि.ग्रॅ. असा डोस तोंडाने देतात. मोठ्या माणसांमध्ये रोज 50 मि.ग्रॅ. अशा डोसने सुरूवात करून हळूहळू डोस वाढवत जातात.
हे किती परिणामकारक आहे?
सिस्टेमिक लुपस एरिदेमॅटोसस (Systemic Lupus Erythematosus) या आजारामध्ये स्टिरॉइडची मात्रा कमी करण्यासाठी या औषधाचा चांगला उपयोग होतो. हे औषध लुपसच्या मूत्रपिंड विकारामध्ये आणि रोगप्रतिकारक शक्ती बिघडल्यामुळे प्लेटलेट पेशी कमी होण्याच्या आजारामध्ये (Immune Thrombocytopenia) तसेच क्वचित त्वचेच्या विकारामध्ये वापरले जाते. उपचारास दाद न देणार्‍या संधिवाताच्या 50% रुग्णांमध्ये या औषधाचा सांध्याचे दुखणे आणि सूज कमी होण्यासाठी उपयोग होतो असे दिसून आले आहे. याचा परिणाम 12 आठवड्यानंतर सुरू होतो आणि उत्तम परिणाम 3-4 महिन्यांनंतर दिसून येतो.
ह्याचे उपद्रव काय आहेत?
औषध चालू केल्यानंतर लगेच दिसून येणार्‍या उपद्रवांमध्ये मळमळ आणि भूक न लागणे हे सर्वात महत्त्वाचे आहेत. काही आठवडे औषध वापरल्यानंतर हे उपद्रव कमी होतात. या औषधांमुळे रक्तपेशी कमी होऊ शकतात आणि यकृताच्या (Liver) एन्झाइम्समध्ये वाढ होऊ शकते. म्हणून रक्ततपासणी आणि लिव्हर एन्झाइम्सची नियमित तपासणी केली पाहिजे. सुरूवातीच्या काळात डोस वाढवत असताना दर पंधरा दिवसांनी रक्त तपासणी करावी लागू शकते.
अझाथायोप्रिन (AZA) हे औषध अ‍ॅलोप्युरिनॉल या औषधाबरोबर कधीही वापरू नये.
• हिमोग्लोबिन 7 ग्रॅम/डी.एल. पेक्षा कमी नसावे.
• पांढर्‍या रक्तपेशींची संख्या 4000/क्यु.मि.मि. पेक्षा कमी नसावी.
• प्लेटलेट पेशींची संख्या 1 लाख/क्यु.मि.मि. पेक्षा कमी नसावी.
• एस.जी.ओ.टी. (SGOT) 80 युनिट/मि.लि. पेक्षा जास्त नसावे.
• एस.जी.पी.टी. (SGPT) 80 युनिट/मि.लि. पेक्षा जास्त नसावे.
• क्रिअ‍ॅटिनिन 2 मि.ग्रॅ./डी.एल. पेक्षा जास्त नसावे.
यापैकी एखाद्या तपासणीत दोष आढळला तर औषध बंद करावे आणि तुमच्या डॉक्टरांना भेटावे.
गर्भारपण
काही विशेष अपाय न होता अझाथायोप्रिन (AZA) गर्भारपणात वापरता येते. परंतु गर्भारपणात हे औषध चालू ठेवण्याची गरज आहे का याविषयी तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा.
सूचना :
ही माहिती म्हणजे वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. सदर लेखातील मते ही तज्ञ डॉक्टरांच्या गटाची आहेत. इंडियन ह्रुमॅटॉलॉजी असोसिएशनचे धोरण यात अंतर्भूत नाही.