ह्रुमॅटॉइड संधिवात

ह्रुमॅटॉइड संधिवात म्हणजे काय?
हा एक स्वयंप्रतिकारशक्तीचा आजार आहे. गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवणार्‍या पोलिसांनी सामान्य नागरिकांवर हल्ले करावेत तसे जंतुसंसर्गासारख्या बाह्य गोष्टींपासून संरक्षण करणार्‍या शरीरातल्या पेशी स्वत:च्या शरीरातल्या सांध्यांना परके समजू लागतात. या आजारात डावी-उजवीकडचे लहान-मोठे एकसारखे सांधे दुखतात आणि सुजतात. सकाळी तीस मिनिटांपेक्षा अधिक काळ सांधे आखडणे हे या आजाराचे आणखी एक लक्षण. रोगप्रतिकारक पेशींचे दोष सांध्यापुरते मर्यादित न राहिल्यास इतर त्रास होऊ शकतो उदा. त्वचेखाली गाठी येणे, तोंड अथवा डोळे सुकणे, दीर्घकाळ खोकला येणे (फुफ्फुसे प्रभावित झाल्यास), इ. सुजेच्या संधिवाताला ‘आमवात’ असे एक रूढ नाव आहे. आजाराची नीट माहिती करून घेतल्यास तुम्ही त्याचा व्यवस्थित सामना करू शकाल. वेळेवर निदान होणे महत्त्वाचे असते. कारण त्यासाठी अनेकविध औषधे उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळेवर औषधे घेत राहिले तर आजार चांगला नियंत्रणात राहू शकतो.
याची महत्त्वाची लक्षणे कोणती?
• पाच किंवा अधिक सांधे दुखणे
• उजवी-डावीकडील सांध्यांची एकसारखी सूज
• सहा आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा आजार
• 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ सकाळी किंवा विश्रांतीनंतर कडकपणा
• इतर लक्षणे उदा. गाठी, कोरडा खोकला
• तोंड किंवा डोळे कोरडे होणे .
या आजाराचे प्रमाण किती आहे?
रोगप्रतिकारशक्ती बिघडण्याचा हा भारतातील आणि जगातील सर्वात जास्त प्रमाणात सापडणारा आजार आहे. शंभरात एखाद्या व्यक्तीला हा आजार होतो. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणत्याही वयात विशेषत: स्त्रियांना होणारा हा आजार आहे.
ह्रुमॅटॉइड संधिवाताची कारणे कोणती? हा आजार होण्याविषयी भाकित करता येते का? तो होऊ नये यासाठी काय करावे?
या गुंतागुंतीच्या आजाराची अनेक कारणे संशोधित केली गेली असली तरी नेमक्या एखाद्या कारणाने तो होतो असे स्पष्ट करता येत नाही. आनुवंशिकता, जंतुसंसर्ग आणि वातावरणातील घटक यांचा त्यात सहभाग असतो. धूम्रपानाने निश्‍चितच धोका वाढतो, आजार बळावतो आणि काही औषधांची कार्यक्षमता कमी होते. त्यासाठी धूम्रपान बंद करणे अत्यावश्यक आहे.
कोणते सांधे प्रभावित होतात?
शरीरातील छोटे सांधे (मनगट, हातापायांची बोटे) आणि मोठे सांधे (खांदा, कोपर, गुडघा) या आजारात सुजतात. खुब्याचा सांधा सामान्यत: बाधित होत नाही. मान आणि कवटीमधला सांधा प्रभावित होऊ शकतो. स्वरयंत्रातील सांध्यांमुळे आवाज घोगरा होतो. जबड्याच्या सांध्यामुळे चावताना दुखते.
हा आजार आनुवंशिक आहे का? माझ्या मुलांना आणि भावंडांना हा आजार होऊ शकतो का?
या आजारास आनुवंशिक तत्त्वे कारणीभूत असली तरी तुमच्या नातेवाईकाला हा आजार होईल की नाही याचा अंदाज बांधता येत नाही. अगदी जुळ्या भावंडांपैकी एकाला हा आजार असल्यास दुसर्‍याला तो होण्याची शक्यता 15-20 टक्केच असते. तुमच्या पूर्वजांना हा आजार नसताना तुम्हालाच तो का झाला अशी तुमच्या मनात शंका येऊ शकते परंतु तो पूर्वजांना झाला असणे आवश्यक नाही तसेच तुमच्या पुढच्या पिढीला तो होईलच असेही नाही.
आहारामुळे आजारावर परिणाम होतो का?
यात आहाराविषयी कोणतेही पथ्य नाही. तुम्ही काहीही खाऊ-पिऊ शकता. मात्र एखाद्या पदार्थाने तुमचे दुखणे वाढत असेल तर तो तुम्ही टाळला पाहिजे. तुम्ही जितकी पाहिजे तितकी प्रथिने आणि आंबट फळे खाऊ शकता. मात्र तुमचे वजन तुम्ही नियंत्रणात ठेवलेच पाहिजे. तुमच्या उंचीसाठी तुमचे किती वजन असावे हे तुमच्या डॉक्टरांना विचारा.
मानसिक तणावाचा काही परिणाम होतो का?
एखाद्या मानसिक आघातामुळे आजार सुरू झाला अथवा वाढला असे काही रुग्णांना वाटते. याविषयी निश्‍चित माहिती नाही.
हा आजार सामान्यत: कसा वाढत जातो?
एखाद्या रुग्णामध्ये आजार कसा वाढेल हे सांगणे अवघड असले तरी ह्रुमॅटॉलॉजीच्या प्रगतीमुळे नेमक्या उपायांनी आजार पूर्णपणे नियंत्रणात आणला जाऊ शकतो. त्यासाठी त्वरित उपचार सुरू झाले पाहिजेत आणि डॉक्टरांच्या सूचनांचे तंतोतंत पालन केले पाहिजे. कोणते उपचार उपलब्ध आहेत याविषयी डॉक्टरांशी चर्चा करा. सामान्यत: सुरूवातीला मेथोट्रेक्सेट हे औषध दिले जाते. ते साधारणत: 60% ते70% रुग्णांमध्ये उपयुक्त आहे. औषधांचा परिणाम काही काळानंतर दिसू लागतो. तुमच्या अपेक्षांविषयी डॉक्टरांशी चर्चा करा. तणाव किंवा जंतुसंसर्गाने आजार वाढू शकतो. अशा पद्धतीने आजार कमी-जास्त होऊ शकतो. परंतु रात्रीनंतर पहाट होते हे लक्षात ठेवले पाहिजे. कामाला लागले की सकाळचा कडकपणा कमी होतो. सकाळी उठून कामाला लागा म्हणजे कडकपणा कमी होईल. 10-15% रुग्णांचा आजार सहज नियंत्रणात येत नाही. लोकांमध्ये जागरूकता वाढली की लवकर निदान, तसेच उपचारांसाठी अनेक औषधे यामुळे हे चित्र बदलत आहे.
आजार वाढला तर काय करावे?
तुमची नेहमीची औषधे चालू ठेवा. काही दिवस वेदनाशामक औषधे घ्या. साधे व्यायाम, शेकणे असे उपाय करा. तुमच्या डॉक्टरांना भेटा.
हा आजार जीवघेणा आहे का?
सांध्याखेरीज अनेक अवयव यात बाधित होऊ शकतात. मात्र चांगले उपचार आणि वेळेवर औषधे घेतल्यास आयुर्मान इतर सामान्य लोकांप्रमाणेच असते.
या आजाराविषयी गैरसमजुती कोणत्या?
1. हा आजार संसर्गजन्य नाही.
2. हा फक्त ‘वयस्कर’ लोकांनाच होतो असे नाही.
3. औषधे ही प्रतिकारशक्ती नियंत्रित करत असल्याने त्यांचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. मात्र त्यापेक्षा आजार अधिक घातक आहे. तुमचे डॉक्टर रक्ततपासण्या करून औषधांच्या दुष्परिणामांवर लक्ष ठेवतील.
4. ‘मला या औषधांची सवय लागेल का? मी त्यांच्यावर आयुष्यभर अवलंबून राहीन का?’ अशी तुमच्या मनात शंका येईल. परंतु हे इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा बरे नाही का? तुमचे जगणे तुमच्या स्वाधीन ठेवा.
5. लोकांचे सल्ले मानून आहाराचे फार कडक पथ्य केले तर खायला काही उरणारच नाही. तुम्हाला आवडतील तितकी प्रथिने खा.
कोणती औषधे उपलब्ध आहेत? त्यांचे दुष्परिणाम कोणते?
या आजारासाठी अनेक औषधे उपलब्ध आहेत. त्यांचे दुष्परिणाम होऊ शकतात. ते तुम्हाला माहीत असावे परंतु त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. औषधांची नीट माहिती असली म्हणजे त्यांच्याशी जुळवून घेता येते. सामान्यत: चुकीचा डोस (अधिक मात्रा) किंवा दोन-तीन औषधांचा एकत्रित परिणाम यामुळे विशेषत: त्रास होतो. त्यासाठी तुमचे डॉक्टर काही प्राथमिक तपासण्या करतील आणि पुढील प्रत्येक भेटीच्या वेळी आवश्यक त्या तपासण्या करून दुष्परिणामांवर लक्ष ठेवतील. म्हणून डॉक्टरांकडून औषधांची नीट माहिती घेण्यासाठी पुरेशी चर्चा केली पाहिजे.
ही औषधे मला किती दिवस घ्यावी लागतील?
आजाराचे निदान आणि उपचार लवकर झाले तर बरेच दिवस आजार नियंत्रणात राहतो. त्यानंतर कमीत-कमी औषधांवर भागते. क्वचित काही रुग्णांचे औषध बंदही होऊ शकते. मात्र मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाप्रमाणे सामान्यत: या आजारात देखील औषध कायम घ्यावे लागते.
आजार अगदी कमी होणे किंवा त्यातून सुटका होणे म्हणजे काय?
सांध्याचे अगदी जरासे दुखणे किंवा तेथे थोडीशीच सूज येणे आणि रक्ताचे रिपोर्टस् नॉर्मल असणे म्हणजेच आजार अगदी कमी होणे किंवा उत्तम प्रकारे नियंत्रणात येणे. त्यासाठी डॉक्टर अनुभवाने आणि आजाराच्या तीव्रतेचे काही निर्देशांक वापरून निर्णय घेतात.
आयुर्वेद, नॅचरोपॅथी, होमिओपॅथी यांचा उपयोग होतो का?
अशा औषधांची आधुनिक औषधांशी काही परस्पर प्रक्रिया होऊ शकते हे लक्षात घेतले पाहिजे. अशी औषधे तुम्ही घेत असाल तर ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांना सांगा. तुमचे अनुभव त्यांना सांगा आणि एकमेकांच्या विचाराने निर्णय घ्या.
फिजिओथोरपी व्यायामाचे काय महत्त्व आहे?
योग आणि व्यायामाचे महत्त्व सार्‍या जगाला पटू लागले आहे. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते, ती शांत होते. व्यायाम हा तुमच्या उपचारांचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. हा उपचार मोफत असला तरी त्यासाठी स्वयंशिस्त पाहिजे कारण आपण त्याकडे बहुधा दुर्लक्ष करतो. योग, प्राणापेक्ष व्यायाम (एरोबिक) आणि दीर्घ श्‍वसनाचे व्यायाम हे सारे फार महत्त्वाचे आहेत. फक्त औषधाने काही जादू होईल असे नाही. एखाद्या मशीनमध्ये वंगण पुरेसे असले तरी मशीन न वापरल्यास ते गंजेल तसेच हे आहे.
याचा माझ्या कामावर परिणाम होईल का?
होय, तुमची कार्यक्षमता आणि उत्पादकता कमी झाल्याने तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. हे आजाराच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. कार्यक्षमता सुधारण्याचे दोन उपाय म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याचे तंतोतंत पालन करणे आणि शक्य तितके काम करीत रहाणे. सक्रिय राहण्याने आजार नियंत्रित होण्यास मदतच होते. तुमच्या कामासाठी ऑक्युपेशनल थेरपिस्टना भेटा ते तुम्हाला परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत करतील आणि तुम्हाला तुमची उत्पादनक्षमता वाढल्याचे जाणवेल.
उत्साह कसा टिकवून ठेवायचा?
व्यायाम आणि अधूनमधून विश्रांती यांचा समतोल राखल्यास उत्साह टिकून राहतो. तुम्हाला कधी थकल्यासारखे वाटेल आणि विश्रांतीनंतर कडकपणा जाणवेल. पण ते तात्पुरते असते आणि क्रियाशीलतेने निघून जाते. सुरूवातीला तुमची उद्दिष्टे कमी ठेवा आणि ती हळूहळू वाढवा.
माझ्या दुखण्याविषयी इतरांशी बोलावे की नाही?
हा वैयक्तिक निर्णय आहे. या शारीरिक आजाराचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका. खंबीर रहा. जर तुम्हाला कोणाशी बोलावेसे वाटत असेल तर बोला. अशा चर्चेचा फायदाच होतो.
आजार संपूर्णपणे बरा होतो का?
उपलब्ध औषधांनी आजार बरा होत नसला तरी संपूर्णपणे नियंत्रणात आणला जाऊ शकतो. योग्य वेळी निदान आणि उपचार हे यासाठी महत्त्वाचे आहेत.
याने थकवा येतो का? उदासीन वाटते का?
होय. कोणत्याही दीर्घकालीन आजारात असे होऊ शकते. सूज, आजाराचे जीर्ण स्वरूप आणि औषधे यांसारख्या काही गोष्टींनी तुम्हाला थकल्यासारखे वाटू शकते. मात्र आजाराचे उत्तम नियंत्रण आणि व्यायाम यांनी त्यावर मात करता येते. आजाराच्या तीव्रतेपेक्षा त्याविषयीच्या चिंतेमुळे बहुधा निर्णयक्षमता कमी होते. तुमची उद्दिष्टे आणि तुमचे कुटुंब यांची आठवण ठेवा म्हणजे तुम्हाला उत्साही वाटेल. तुमचे मित्र आणि कुटुंबीय यांच्यामधे मिसळा. स्वतंत्र व्हा. संधिवात ही तुमची ओळख नसून तुमचे काम आणि तुमचे समाजातील स्थान ही तुमची ओळख आहे हे नेहमी लक्षात ठेवा. डॉक्टरांशी फक्त सांध्यांविषयी न बोलता तुमच्या भाव-भावना देखील सांगा. उपलब्ध संसाधनांच्या आधाराने स्वत:च स्वत:चे शिल्पकार व्हा. डॉक्टरांशी आणि रुग्णांशी चर्चा करा. सक्रिय रहा आणि उत्तम जीवन जगा.
अन्य कोणत्या उपद्रवांची मला माहिती असायला पाहिजे?
ह्रुमॅटॉइड आमवाताचे या आधी सांगितल्याप्रमाणे इतर अवयवांवर परिणाम होतात. परंतु ते ओळखता येतात आणि त्यांचे उपचार करता येतात. तुमच्या लक्षणांविषयी तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. जीर्ण आजारामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्यामुळे ब्लड प्रेशर तसेच रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल तपासा. आजार नियंत्रणात राहून त्यावर नीट लक्ष ठेवल्यास असे उपद्रव टाळता येतात तसेच त्यांचे उपचार करता येतात.
याचा गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो का? मी गर्भार राहू शकते का?
होय. गर्भधारणा शक्य आहे पण त्याआधी तुमच्या औषधांविषयी डॉक्टरांशी चर्चा करा. मेथोट्रेक्सेट आणि लेफ्लुनामाईड सारखी औषधे घेत असताना गर्भधारणेस परवानगी नाही. गर्भारपणाच्या तिसर्‍या तिमाहीत वेदनाशामक औषधे घेऊ नयेत. गर्भधारणेआधी सहा महिने तरी आजार संपूर्ण आणि चांगला नियंत्रणात असला पाहिजे. गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवले पाहिजे आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घेतली पाहिजेत.
माझे योगदान काय असावे?
सारे जग व्यक्तिविशिष्ट औषध-योजना अंगीकारत आहे म्हणून अधिकाधिक संशोधन करून आजार समजून घेणे हे महत्त्वाचे आहे. अशा संशोधनाची माहिती घेऊन तुम्ही त्यात सहभागी होऊ शकता. कदाचित त्याचा तुम्हाला लगेच फायदा होणार नाही पण तुमचे योगदान हे शास्त्राच्या प्रगतीला निश्‍चितपणे मदत करू शकेल.
सूचना :
ही माहिती म्हणजे वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. सदर लेखातील मते ही तज्ञ डॉक्टरांच्या गटाची आहेत. इंडियन ह्रुमॅटॉलॉजी असोसिएशनचे धोरण यात अंतर्भूत नाही.