लेफ्लुनामाइड

हे औषध कसे घ्यायचे?
हे औषध सुरूवातीला 100 मि.ग्रॅ./प्रति दिवसाला असे पहिले तीन दिवस देऊन त्यानंतर दररोज 20 मि.ग्रॅ. देऊ शकतो किंवा सुरूवातीपासूनच 20 मि.ग्रॅ. वापरू शकतो. जेव्हा इतर औषधांबरोबर वापरले जाते किंवा मुलांमध्ये वापरले जाते तेव्हा सुरूवातीचा डोस दररोज 10 मि.ग्रॅ. दिला जाऊ शकतो. ही गोळी 10 मि.ग्रॅ. आणि 20 मि.ग्रॅ. अशा दोन प्रमाणात मिळते. म्हणून गोळी घेण्यापूर्वी ती तपासून पहावी. जर गोळीमुळे काही उपद्रव दिसले तर डोस दररोज 10 मि.ग्रॅ. असा कमी केला जाऊ शकतो.
हे किती परिणामकारक आहे?
संधिवाताच्या 60 ते 70% रुग्णांमध्ये दुखणे आणि सूज ह्या औषधांमुळे कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रुग्णाची कार्यक्षमता वाढते आणि जीवनस्तर उंचावतो. औषधाचा परिणाम 6 ते 8 आठवड्यात सुरू होतो आणि जास्त फायदा 3-4 महिन्यात दिसून येतो. लहान मुलांच्या संधिवातामध्ये आणि सोरियासिसच्या संधिवातामध्ये सुद्धा हे परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे.
ह्याचे अपायकारक परिणाम काय आहेत?
याप्रमाणे डोस वापरला तर फारच थोडे गंभीर उपद्रव होतात. पुरळ येणे, खाज येणे, केस गळणे, पोट बिघडणे हे उपद्रव सुरूवातीच्या काळात जास्त प्रमाणात दिसून आले आहेत. जर खूप जास्त त्रास झाला तर आपल्या डॉक्टरांना भेटा. क्वचितप्रसंगी ह्या औषधामुळे रक्तपेशी कमी होऊ शकतात यासाठी नियमित तपासणी केली पाहिजे. काही रुग्णांमध्ये यकृतामध्ये (लिव्हर) बिघाड झाल्याचे दिसून आले आहे. क्वचितप्रसंगी ह्यामुळे फुफ्फुसात दोष निर्माण होऊ शकतो.
उपद्रवांवर नियमित लक्ष कसे ठेवता येईल?
सुरूवातीला 3 महिने पुढील रक्त तपासण्या दरमहा कराव्यात, त्यानंतर दर 2-3 महिन्यांनी कराव्यात.
• हिमोग्लोबिन 7 ग्रॅम/डी.एल. पेक्षा कमी नसावे.
• पांढर्‍या रक्तपेशींची संख्या 4000/क्यु.मि.मि. पेक्षा कमी नसावी.
• प्लेटलेट पेशींची संख्या 1 लाख/क्यु.मि.मि. पेक्षा कमी नसावी.
• एस.जी.ओ.टी. (SGOT) 80 युनिट/मि.लि. पेक्षा जास्त नसावे.
• एस.जी.पी.टी. (SGPT) 80 युनिट/मि.लि. पेक्षा जास्त नसावे.
• क्रिअ‍ॅटिनिन 2 मि.ग्रॅ./डी.एल. पेक्षा जास्त नसावे. यापैकी एखाद्या तपासणीत दोष आढळला तर औषध बंद करावे आणि तुमच्या डॉक्टरांना भेटावे.
गर्भारपण
लेफ्लुमानाइड गर्भारपणात अजिबात वापरत नाहीत. म्हणून मूल होऊ शकणार्‍या वयात स्त्रियांनी संततीप्रबंधक वापरावे. औषध बंद केल्यानंतर कमीत कमी 2 वर्षांपर्यंत गर्भार राहू नये.
सूचना :
ही माहिती म्हणजे वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. सदर लेखातील मते ही तज्ञ डॉक्टरांच्या गटाची आहेत. इंडियन ह्रुमॅटॉलॉजी असोसिएशनचे धोरण यात अंतर्भूत नाही.