मेथोट्रेक्सेट

मेथोट्रेक्सेट (MTX) हे वेगवेगळ्या प्रकारच्या संधिवातांमध्ये अनेक वर्षांपासून सर्वात जास्त वापरले जाणारे औषध आहे.
हे औषध कसे घ्यायचे?
मेथोट्रेक्सेट (MTX) आठवड्यातून एक दिवस 10 ते 25 मि.ग्रॅम अशा वेगवेगळ्या मात्रेत दिले जाते. डॉक्टर सुरूवातीला कमी डोसने सुरूवात करतात आणि आजाराच्या प्रमाणानुसार ह्याचा डोस वाढवतात. लहान मुलांमध्ये 1 मि.ग्रॅ./कि.ग्रॅ. एवढा जास्तीत जास्त डोस वापरता येतो.
हे कितपत परिणामकारक आहे?
65 ते 70% रुग्णांमध्ये या औषधामुळे सांध्यांचे दुखणे आणि सुजण्याचे प्रमाण कमी होऊन उपयोग झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कार्यक्षमता वाढते आणि जगण्याची गुणवत्ता सुधारते. औषधाचा परिणाम 6 ते 10 आठवड्यानंतर सुरू होतो आणि 3-4 महिन्यांनी जास्तीत जास्त उपयोग होतो.
ह्या औषधाचे उपद्रव काय आहेत?
मळमळ, भूक न लागणे, जुलाब होणे, तोंड येणे हे लगेच दिसून येणारे उपद्रव आहेत. काही आठवड्यांच्या औषधाच्या वापरानंतर ते कमी होतात. ह्या औषधामुळे रक्तपेशींच्या संख्येवर परिणाम होतो आणि यकृत (Liver) विकरांचे (एन्झाइम्स) प्रमाण वाढते. यासाठी रक्तपेशी आणि यकृत विकर (लिव्हर एन्झाइम्स) नियमित तपासून काळजी घेतली पाहिजे. क्वचितप्रसंगी औषधामुळे कोरडा खोकला आणि श्‍वासास त्रास होऊ शकतो.
उपद्रवांवर नियमित लक्ष कसे ठेवता येईल?
सुरूवातीला 3-4 महिने खालील रक्त तपासण्या दर महिन्याला कराव्यात. त्यानंतर दर 2-3 महिन्यांनी कराव्यात.
• हिमोग्लोबिन 7 ग्रॅम/डी.एल. पेक्षा कमी नसावे.
• पांढर्‍या रक्तपेशींची संख्या 4000/क्यु.मि.मि. पेक्षा कमी नसावी.
• प्लेटलेट पेशींची संख्या 1 लाख/क्यु.मि.मि. पेक्षा कमी नसावी.
• एस.जी.ओ.टी. (SGOT) 80 युनिट/मि.लि. पेक्षा जास्त नसावे.
• एस.जी.पी.टी. (SGPT) 80 युनिट/मि.लि. पेक्षा जास्त नसावे.
• क्रिअ‍ॅटिनिन 2 मि.ग्रॅ./डी.एल. पेक्षा जास्त नसावे.
यापैकी एखाद्या तपासणीचा रिपोर्ट विकृत (Abnormal) आला तर औषध बंद करावे आणि तुमच्या डॉक्टरांना भेटावे.
गर्भारपण
मेथोट्रेक्सेट (MTX) गर्भारपणात वापरू नये. गर्भार राहण्यापूर्वी 3 महिने औषध बंद करणे उत्तम.
सूचना :
ही माहिती म्हणजे वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. सदर लेखातील मते ही तज्ञ डॉक्टरांच्या गटाची आहेत. इंडियन ह्रुमॅटॉलॉजी असोसिएशनचे धोरण यात अंतर्भूत नाही.