हायड्रोक्सिक्लोरोक्विन

25 वर्षांपासून अधिक काळापासून हायड्रॉक्सिक्लोरोक्विन (HCQ) औषध विविध त्वचाविकार आणि संधिवातासाठी वापरले जाते आणि ते अतिशय सुरक्षित आहे.
हे कसे घ्यायचे?
याची गोळी रोज रात्री झोपताना घेतली पाहिजे. 200 मि.ग्रॅ. ची गोळी मिळते. सुरूवातीला 1-2 गोळ्या रोज रात्री झोपताना देतात. नंतर एकदा आजार नियंत्रणात आला की डोस रोज 1 गोळी इतका कमी करण्यात येतो.
हे कितपत प्रभावी आहे?
थकवा, सांधेदुखी, ताप, त्वचेवर पुरळ येणे, तोंडात फोड येणे अशा तक्रारी असलेल्या सिस्टेमिक लुपस एरिदेमॅटोससच्या रुग्णांसाठी हे औषध फारच परिणामकारक आहे. सुजेच्या आमवातात 50-60% रुग्णांच्या सांध्यांची लक्षणे ह्या औषधांमुळे कमी होतात.
याचे उपद्रव काय आहेत?
वरीलप्रमाणे नेहमीच्या मात्रेत त्याचे गंभीर उपद्रव फार कमी आहेत. मळमळणे, भूक न लागणे, उलटी, निद्रानाश असे हे औषध सुरू केल्यानंतर होणारे काही उपद्रव आहेत. तरीही औषध सुरू ठेवले किंवा डोस कमी केला तर उपद्रव कमी होतात. गंभीर उपद्रव असतील तर त्वरित डॉक्टरांना भेटावे. या औषधामुळे उजेडाच्या भोवती प्रभामंडळ (Halo) दिसणे, रात्री गाडी चालवताना त्रास होणे इत्यादी दृष्टीचे उपद्रव क्वचित होऊ शकतात. म्हणून हे औषध घेताना डोळ्यांची नियमित तपासणी केलीच पाहिजे. क्वचित त्वचा काळसर पडू शकते. म्हणून हे औषध रात्री घेतले पाहिजे.
नियमित लक्ष कसे ठेवले पाहिजे?
फंडस (Fundus) आणि दृष्टिक्षेत्राचे (Field of Vision) मूल्यमापन करण्यासाठी डोळ्यांची वार्षिक तपासणी केली पाहिजे.
गर्भारपण
HCQ गर्भारपणात वापरता येते. याचे काही विषारी दुष्परिणाम नाहीत. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे औषध गर्भारपणात घ्यावे, अन्यथा घेऊ नये.
सूचना :
ही माहिती म्हणजे वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. सदर लेखातील मते ही तज्ञ डॉक्टरांच्या गटाची आहेत. इंडियन ह्रुमॅटॉलॉजी असोसिएशनचे धोरण यात अंतर्भूत नाही.