फायब्रोमायाल्जिया

फायब्रोमायाल्जिया काय आहे?
फायब्रोमायाल्जिया (FM) हा आजार किंवा लक्षण समुदाय आहे. त्यात प्रामुख्याने सर्वांग वेदना आणि प्रचंड थकवा असतो.
हा कशामुळे होतो?
ह्या आजाराचे नेमके कारण माहीत नाही. त्याची अनेक कारणे असू शकतात. विषाणु-संसर्गासारखे पर्यावरणीय आघात, मानसिक आणि शारीरिक ताण तसेच उदासीनता यांमुळे या आजाराची सुरूवात होऊ शकते. सुजेचा संधिवात, सिस्टेमिक लुपस एरिदेमॅटोसेस आणि शोग्रेन्स सिन्ड्रोम अशा र्‍हुमॅटिक आजारांच्या जोडीनेही फायब्रोमायाल्जिया (FM) हा आजार असू शकतो.
किती प्रमाण आहे?
हा आजार अगदी सामान्यपणे आढळणारा आहे. साधारण 3% लोकांना हा आजार होतो. वयाच्या चाळीशीत याचे प्रमाण सर्वात जास्त असते. फायब्रोमायाल्जिया (FM) बहुधा स्त्रियांमध्ये होणारा आजार आहे. परंतु तो पुरुषांना आणि मुलांना सुद्धा होऊ शकतो.
निदान कसे करावे?
रक्तातली साखर तपासल्यानंतर जसे मधुमेहाचे निदान होते तशी फायब्रोमायाल्जियासाठी एखादी विशिष्ट अशी कोणती तपासणी नाही. याचे निदान विविध लक्षणे आणि शारीरिक तपासणी करून होते. उजवी-डावीकडे शरीरभर पसरलेल्या वेदना हेच या आजाराचे विशेष लक्षण आहे. सामान्यत: मानेचे आणि पाठीचे दुखणे असते. प्रचंड थकवा, सकाळी उठल्यानंतर सांध्यांना सूज आल्यासारखी वाटणे, हातापायाची बधिरता ही लक्षणे सुद्धा सामान्यत: असतात. याच्या बरोबरीनेच अर्धशिशीसारखी (Migrain) डोकेदुखी, छातीत जळजळ, वारंवार विशेषत: खाल्ल्यानंतर - शौचप्रवृत्ती (Irritable Bowel) तसेच वारंवार लघवीला जाण्याची अनावर इच्छा होणे (Bladder) ही लक्षणे असू शकतात तसेच फायब्रोमायाल्जियाच्या रुग्णांच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी दाबले असता दुखते (Tender Points). शारीरिक तपासणी करताना डॉक्टरांना ते समजू शकते. आजाराची विशिष्ट लक्षणे आणि दुखणार्‍या ठिकाणांच्या आधारे फायब्रोमायाल्जियाचे निदान होते. या आधीच सांगितल्याप्रमाणे फायब्रोमायाल्जियाच्या निदानासाठी कोणती विशिष्ट प्रयोगशालेय तपासणी नाही. फायब्रोमायाल्जियाचे निदान होण्याआधी अनेकविध आजारांची शक्यता लक्षात घेऊन विविध तपासण्या केल्या जातात. कॅन्सर आणि संधिवात नाही याचीही डॉक्टर खात्री करून घेतात.
सध्याचे संशोधन काय सांगते?
फायब्रोमायाल्जियामध्ये वेदना सहन करण्याची क्षमता कमी असणे आणि संवेदनांची जाणीव बदलणे असे संमिश्र स्वरूप आढळते. सामान्य लोकांपेक्षा फायब्रोमायाल्जियाच्या रुग्णांची वेदनेची संवेदना जास्त तीव्र असते. एकच संप्रेरक (Stimulus) सामान्य लोकांना आणि फायब्रोमायाल्जियाच्या रुग्णांना दिले तर फायब्रोमायाल्जियाच्या रुग्णांना सामान्य लोकांपेक्षा वेदनेची जाणीव जास्त प्रमाणात होते असे निदर्शनास आले. मेंदूमध्ये दुखण्याची संवेदना ग्रहण करण्याची (Central Sensitization) प्रक्रिया होते. वेदना ही दुखण्याच्या ठिकाणी निर्माण होत नाही. तिची जाणीव चेतासंस्थेत (Nervous System) होते. इलेक्ट्रोफिजिओलॉजीच्या एका अभ्यासाप्रमाणे फायब्रोमायाल्जियाच्या रुग्णांमध्ये निद्रानाशाचा विकार आढळून येतो. तर झोपेत काही रुग्णांचा श्‍वास कमी-जास्त (Sleep Apnoea) होतो. मज्जासंस्थेभोवतालच्या द्रवामध्ये सिरोटोनिन आणि सबस्टन्स-पी अशा चेतावाहक रसायनांच्या प्रमाणातही बदल दिसून येतात. सिम्पॅथेटिक चेतासंस्था, अंतस्त्रावी ग्रंथी (Hypothalamo-Pituitary-Adrenal axis) आणि शरीरवाढीचे अंतस्त्राव यांमध्ये काही विशेष बदल फायब्रोमायाल्जियामध्ये दिसतात. त्यामुळे ताणाचे नियंत्रण करता येत नाही. उदासीनता आणि इतर मानसिक आजारांचा फायब्रोमायाल्जियाशी संबंध असल्याचे निदर्शनास आले आहे. जीर्ण थकवा (Chronic Fatigue Syndrome), ताणामुळे होणारी डोकेदुखी (Tension Headache), पोट बिघडणे, छातीत वेदना (हृदयविकाराशी संबंधित नसलेल्या), पोटात व्रण नसताना भूक मंदावणे, प्रदीर्घ काळ ओटीपोटात दुखणे, उदासीनता, काळजी आणि फायब्रोमायाल्जिया हे अनेकदा एकत्र आढळतात. त्यामुळे त्यांची कारणेही समान असावीत असे दिसते.
याचे उपचार कसे करतात?
सामान्यत: फायब्रोमायाल्जियाची लक्षणे सौम्य स्वरूपाची असतात आणि रुग्ण एक सामान्य आयुष्य जगू शकतो. काही रुग्णांमध्ये हे दुखणे तीव्र असू शकते - अगदी सुजेच्या र्‍हुमॅटॉइड आमवाताइतके. हा रोग पूर्ण बरा होत नाही, पण दुखण्याची तीव्रता कमी करता येते. पॅरासेटॅमॉल आणि आयबुप्रोफेनसारख्या वेदनाशामकांचा काही अंशी उपयोग होतो. या औषधांना संधिवाताच्या रुग्णांइतका प्रतिसाद फायब्रोमायाल्जियाचे रुग्ण देत नाहीत. या आजारात वेदना वेगळ्या प्रकारची असल्यामुळे त्यासाठी वेगळी औषधे लागतात. उदासीनतेच्या उपचारांसाठी लागणारी औषधे अगदी अल्पमात्रेत वापरली तर झोप सुधारते तसेच वेदना सहन करण्याची क्षमता वाढते. अमिट्रिप्टालिन (Amytryptiline) हे असेच एक औषध आहे. डोथायपिन (Dothiepin), नॉरट्रिप्टालिन (Nortryptiline), ड्युलोक्झेटिन (Duloxetine) आणि मिल्नासिप्रॅन (Milnacipran) ही फायब्रोमायाल्जियाच्या रुग्णास उपयोगी असलेली अन्य काही उदासीनतेसाठी वापरली जाणारी (Anti-Depressant) औषधे. प्रिगॅबॅलिन (Pregabalin) आणि गॅबापेन्टिन (Gabapentin) सारखी फिटच्या (आकडी येणे) आजाराची औषधेसुद्धा (Anti-Convulsant) फायब्रोमायाल्जियाचे दुखणे कमी करण्यास उपयोगी आहेत. कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी (Cognitive Behavioural Therapy - परिस्थिती उमजून त्यानुसार वागणे) रुग्णांना आपला आजार समजून घेण्यास मदत करते. मानसोपचार करणारे प्रशिक्षित वेदनातज्ञ (Pain Psychologists) हे काम करतात. तीव्रवेदनेशी जुळवून न घेतल्याने अयोग्य वर्तन होते तसेच गैरसमजुती निर्माण होतात. कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपीमुळे रुग्णाचा आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून सर्जनशील आयुष्य जगण्यासाठी रुग्णाला प्रोत्साहन मिळते. ताणाचे व्यायाम (Stretching Exercises 30 मिनिटे दिवसातून कमीतकमी 5 वेळा) केले पाहिजेत. हा उपचाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. चालणे, पोहणे आणि सायकल चालवल्यामुळेसुद्धा कार्यक्षमता वाढते तसेच शारीरिक आरोग्य सुधारते. वेदना आणि थकव्यामुळे रुग्ण हतबल होतो. व्यायामाची तीव्रता आणि वेळ हळूहळू वाढवली म्हणजे व्यायामानंतर दुखणार नाही. मन शांत ठेवण्यासाठी योग, ताइ ची, नृत्य, आणि प्राणापेक्ष व्यायाम (एरोबिक्स) यांचा सुद्धा अनेकांना फायदा होतो. फायब्रोमायाल्जियाचे उपचार अनेक डॉक्टर्स एकत्रितपणे करत असतात. त्यात संधिवाततज्ञ (Rheumatologist), वेदना तज्ञ (Pain Consultants), व्यायाम तज्ञ (Physical Therapists) आणि वेदनेचे मानसोपचारतज्ञ (Pain Psychologist) यांचा समावेश असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्ण स्वत:च या उपचार करणार्‍या संघाचा एक सक्रिय सदस्य असतो.
फायब्रोमायाल्जियासोबत कसे जगावे?
• वेदना जरी प्रदीर्घ आणि तीव्र असल्या तरी हा आजार जीवघेणा किंवा शारीरिक अपंगत्व निर्माण करणारा नाही. ही समाधानाची बाब समजली पाहिजे.
• रिलॅक्स व्हा - शरीर आणि मन शिथिल ठेवा. तुमचे दुखणे आणि उत्साह यांना अनुसरून किती काम करायचे ते ठरवा.
• वेदना म्हणजे नेहमीच काही तरी बिघडले आहे असे नाही. म्हणून काम करणे संपूर्ण थांबवू नका.
• थोड्याशा त्रासाकडे दुर्लक्ष करा. आपली कार्यक्षमता वाढवण्याकडे लक्ष द्या.
• काही दिवस वाईट असतील तर काही चांगले असतील याची तयारी ठेवा.
• दोन कामांमध्ये थोडीशी विश्रांती आणि दुपारची थोडी झोप उत्साहवर्धक ठरू शकते.
• गरम पाण्याची अंघोळ आणि उबदार शेक यामुळे ताजेतवाने वाटेल. संध्याकाळी अंघोळ केली तर रात्री जेवणाच्या वेळी प्रसन्न वाटेल.
• नियमित वेळी झोपण्याच्या सवयीचा उपयोग होतो. संध्याकाळी 5 नंतर कॅफीन आणि कोलायुक्त पेये टाळा. पलंगावर लोळत टी.व्ही बघणे टाळा.
• पलंग हा फक्त झोपण्यासाठीच आहे हे मनाशी ठरवा. खोलीतला पंखा चालू ठेवल्यामुळे बाहेरचे अनावश्यक आवाज जाणवणार नाहीत.
• आपले आई-वडील, जोडीदार आणि मित्रांबरोबर मोकळेपणाने वागा. त्यामुळे ते तुमच्या आजाराला जास्त चांगल्याप्रकारे समजून तुम्हाला मदत करू शकतील.
• नवीन छंद जोपासा. वेदना सोडून इतरत्र लक्ष द्या. जीवनातील सकारात्मक गोष्टींकडे तुमचे लक्ष आणि शक्ती केंद्रित करा.
• आजाराला व्यवस्थितपणे समजून घेतले की अनावश्यक तपासण्या आणि त्रासदायक उपचारांपासून तुम्ही स्वत:ला वाचवू शकता.
• व्यायाम आणि सांगितलेले औषध घेणे यात नियमितपणा राखा.
• आजार आणि औषधांबाबत तुमच्या मनात काही शंका किंवा चिंता असल्यास तुमच्या डॉक्टरांसोबत चर्चा करा.
सूचना:
ही माहिती म्हणजे वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. सदर लेखातील मते ही तज्ञ डॉक्टरांच्या गटाची आहेत. इंडियन र्‍हुमॅटॉलॉजी असोसिएशनचे धोरण यात अंतर्भूत नाही.