सिस्टेमिक लुपस एरिदेमॅटोसस

सिस्टेमिक लुपस एरिदेमॅटोसस (लुपस) काय आहे?
सिस्टेमिक लुपस एरिदेमॅटोसस (SLE) हा प्रतिकारशक्ती बिघडल्यामुळे होणारा एक आजार आहे. यात शरीराचे विविध अवयव प्रभावित होतात. स्त्रियांना मूल होण्याच्या वयात प्रामुख्याने हा आजार होतो. आपल्या प्रतिकारशक्तीमुळे सामान्यत: जंतुसंसर्गापासून आपला बचाव होतो. लुपससारख्या आजारात ही प्रतिकारशक्ती आपल्याच शरीरातल्या पेशींवर आक्रमण करते. या आजाराचे परिणाम कोणता अवयव प्रभावित होतो त्यावर अवलंबून असतात. सामान्यत: प्रभावित होणारे अवयव म्हणजे सांधे, त्वचा, मूत्रपिंड आणि मेंदू.
लुपसमध्ये काय होते?
थकवा, सांधेदुखी आणि त्वचेवर पुरळ ही लुपसची सामान्य लक्षणे आहेत. पण लुपसचा प्रभाव अनेक अवयवांवर होऊ शकतो. शरीरांतर्गत अवयवांवर त्याचा परिणाम होतो तेव्हा लक्षणांचे स्वरूप बरेच गंभीर असते. त्वचेच्या उघड्या भागावर सूर्यप्रकाशाने पुरळ येणे, फुलपाखरासारखे चट्टे गाल-नाकावर येणे हे सामान्यत: आढळतात. तोंडात फोड येणे, केस गळणे आणि सांधेदुखी इत्यादी इतर लक्षणे असू शकतात. इतर अवयवांमध्ये सुद्धा त्याची लक्षणे दिसतात. उदा. मूत्रपिंड [लघवीतून प्रोटीन (प्रथिने) जाणे, उच्च रक्तदाब इ]. मेंदू [विचित्र वागणे, उदासीनता, आकडी (फिटस्) येणे पक्षाघात,] हृदय, फुफ्फुस व रक्त (रक्ताल्पता - अ‍ॅनीमिया, प्लेटलेट पेशी कमी होणे, रक्तस्त्राव, रक्त साकळणे) आणि शरीराच्या इतर कार्यप्रणाली.
लुपस कोणाला होतो?
• पुरुषांपेक्षा महिलांमध्ये 9 पटीने जास्त होतो.
• तरुण स्त्रियांमध्ये जास्त होतो.
• मुलांमध्ये सुद्धा होतो पण फार क्वचित.
हा आजार का होतो हे निश्‍चित ठाऊक नाही.
लुपस का होतो?
बाहेरच्या शत्रूंपासून रक्षण करणारी आपली प्रतिकार शक्ती ही एखाद्या सैन्यदलाप्रमाणे आहे. पण लुपसमध्ये ही सेनाच बिघडते. शरीरातल्या आपल्या स्वत:च्या पेशींना ओळखत नाही आणि त्यावर हल्ला करते. यात वातावरण, संप्रेरके (Hormones) आणि आनुवंशिकता असे घटक एकत्रितपणे कारणीभूत असतात. लुपस संक्रामक आजार नाही. आई-वडिलांना लुपस असला तर मुलांना आजार होण्याची शक्यता असली तरी आई-वडिलांकडून प्रत्यक्षपणे हा आजार येत नाही.
लुपसचे काही दीर्घकालीन धोके आहेत का?
लुपस हा एक वैविध्यपूर्ण आजार आहे. भविष्यात काय होईल याचा अंदाज बांधता येत नाही. काही थोड्या रुग्णांमध्ये मूत्रपिंड, मेंदू, हृदय, रक्त अशा महत्त्वाच्या अवयवांमध्ये दोष निर्माण होऊन हा आजार घातक ठरू शकतो. परंतु बहुतेक रुग्णांमध्ये काळजीपूर्वक लक्ष देऊन आधुनिक उपचारांनी आजार नियंत्रणात आणता येतो.
आजाराविषयी मला आणखी काय माहिती असावी?
उन्हात जाऊ नका: SPF 50 किंवा त्यापेक्षा जास्त असलेले सनब्लॉक मलम (लोशन) वापरा.
गर्भनिरोधक: फक्त प्रोजेस्टेरोन किंवा अगदी थोडे इस्ट्रोजेन असलेल्या गर्भनिरोधक गोळ्या वापराव्यात अथवा कंडोमसारखी संसाधने वापरावीत. तुमचे डॉक्टर याविषयी मदत करू शकतील.
जंतुसंसर्ग (Inection): जर तुम्हाला लुपस असेल आणि तुम्ही प्रतिकारशक्ती रोधक (Immunosuppressant) औषध घेत असाल तर तुम्हाला जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त. व्यवस्थित काळजी घ्या. क्षय रोग किंवा काजिंण्यासारखे आजार असलेल्या रुग्णांपासून सावधपणे लांब रहा.
लसीकरण: लसीकरणाची गरज आहे का हे आपल्या डॉक्टरांना विचारा.
मानसिक ताणतणाव: ताणामुळे आजार आहे त्यापेक्षा जास्त गंभीर वाटू शकतो. कोणत्याही ताणतणावावर मात करायला शिका.
थकवा: थकवा हे एक फार महत्त्वाचे त्रासदायक लक्षण आहे. रक्ताल्पता (Anaemia), थायरॉइड ग्रंथींची कार्यक्षमता कमी होणे (Underactive Thyroid) यांसारख्या कारणांनी थकवा येतो. रक्त तपासणीने त्यांचे निदान करून उपचार केले पाहिजेत.
लुपसचे निदान कसे करतात?
आजाराची लक्षणे, शारीरिक तपासणी आणि ANA, anti dsDNA antibody सारख्या रक्त तपासण्या करून आजाराचे निदान करतात.
लुपसचे उपचार कसे करतात?
लुपस बरा करता येत नाही परंतु आजार नियंत्रणात आणता येतो. लक्षणांप्रमाणे वेगवेगळी अनेक औषधे वापरावी लागू शकतात.
लुपसच्या उपचारांसाठी वेगवेगळी औषधे कोणती?
त्वचेवरील पुरळांसाठी स्टिरॉइडयुक्त मलम आणि/किंवा हायड्रॉक्सिक्लोरोक्विन गोळ्या वापरतात. या औषधांमुळे लुपसच्या इतर बहुतेक तक्रारींमध्ये सुद्धा उपयोग होतो. स्टिरॉइड, अ‍ॅझाथायोप्रिन, सायक्लोफॉस्फॉमाइड, मायकोफेनोलेट आणि सायक्लोस्पोरीन ही लुपससाठी वापरली जाणारी इतर काही औषधे आहेत. कुठला अवयव लुपसमुळे प्रभावित झाला आहे यावर त्याची औषधे व उपचारांची पद्धत अवलंबून असते. काही वेळा रक्तदाब कमी करणारी औषधे तुमचे डॉक्टर किंवा र्‍हुमॅटॉलॉजिस्ट देतील. तुम्ही त्यांच्या सल्ल्यानुसारच औषधे घ्यावीत. स्वत:हून औषध सुरू किंवा बंद करणे अतिशय धोकादायक आहे. डॉक्टरांकडे वारंवार नियमित तपासणीस जाऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे रक्त-लघवी तपासून घेतली पाहिजे. औषधे घेताना काही त्रास झाला, नवीन काही तक्रारी उद्भवल्या किंवा तुम्ही गर्भवती राहिलात तर डॉक्टरांना अवश्य कळवा.
दिनचर्या -
व्यायाम: डॉक्टरांनी सांगितलेले व्यायाम करून सांध्यांवर जास्त ताण न देता तुम्ही स्वस्थ राहू शकता.
आहार अणि पोषण: विशिष्ट आहाराचा लुपसच्या नियंत्रणासाठी उपयोग होतो असा फारसा पुरावा नाही. लुपसच्या रुग्णांना हार्ट-अ‍ॅटॅक किंवा पक्षाघात होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच चरबीयुक्त पदार्थ आणि मीठ यांचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे. धूम्रपान बंद करावे.
गर्भारपण आणि लुपस जर मूल होण्याची इच्छा असेल तर गर्भधारणेपूर्वीच डॉक्टरांना तुमच्या योजनेची कल्पना द्या. गर्भारपणात लुपसचे प्रमाण वाढण्याविषयी विवादास्पद पुरावे आहेत. गर्भधारणेच्यावेळी आजार नियंत्रणात असेल आणि मूत्रपिंडाचा आजार नसेल तर गर्भारपणात विशेष त्रास होणार नाही. हृदय, फुफ्फुस आणि मूत्रपिंडावर गर्भधारणेचा प्रचंड ताण येत असल्यामुळे लुपसच्या गंभीर लक्षणांनी पीडित फार थोड्या स्त्रियांना गर्भधारणेस परवानगी देता येत नाही. तुमचे स्त्रीरोगतज्ज्ञ याबाबत विचार करतील आणि जरूर वाटल्यास तुमच्या र्‍हुमॅटॉलॉजिस्टशी बोलतील. जर तुमच्या रक्तात अ‍ॅन्टिफॉस्फोलिपिड (Antiphospholipid Antibodies - APLA) वाढलेल्या असतील तर गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते. लुपस असलेल्या मातेकडून नवजात अर्भकाला लुपस सिन्ड्रोम होण्याची शक्यता फार कमी. नवजात शिशुमध्ये काही वेळा त्वचेवर पुरळ येणे आणि हृदयाची गती कमी होणे अशी लक्षणे दिसू शकतात. लुपस असलेल्या मातांची बहुतेक बाळे चांगली असतात. गर्भारपणात स्वाभाविकपणे डॉक्टर सावधतेने औषध वापरतात. गरज असेल तर हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, स्टिरॉइड्स आणि अ‍ॅझाथायोप्रिन गर्भारपणात सुरू ठेवतात.
सूचना :
ही माहिती म्हणजे वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. सदर लेखातील मते ही तज्ञ डॉक्टरांच्या गटाची आहेत. इंडियन ह्रुमॅटॉलॉजी असोसिएशनचे धोरण यात अंतर्भूत नाही.